आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी कारवाई करा;सकल मराठा समाजाची मागणी

Foto

 औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एका विशिष्ट उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करीत एका समाजाच्या भावना दुखावल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. सदरील क्लिपमध्ये बोलणारा तरुण व त्याच्या पाठीमागे असणार्‍या व्यक्‍तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. आज सकाळी सकल समाजातर्फे सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांना निवेदन सादर करण्यात आले. 

लोकसभा निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार उभे होते. त्यात एका समाजाने एकवटून एकाच उमेदवाराला मतदान करावे. कटकट गेट परिसरातील एका समाजाचे नागरिक हे दुसर्‍या उमेदवाराला मतदान करणार असल्याचे त्या व्हिडीओ क्लिपमध्ये म्हटले आहे. जर आपण एका समाजाचे आहोत तर आपण एकाच उमेदवाराला मतदान केले पाहिजे, असे त्या क्लिपमध्ये तो तरुण बोलत आहे. तसेच एका थोर व्यक्तिमत्त्वालाबद्दल त्या व्हिडीओ क्लिपमध्ये आक्षेपार्ह बोलले गेले आहे त्यामुळे सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. सदर तरुणावर व त्याच्या पाठीमागील व्यक्‍तीवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज काही तरुणांनी पोलिसांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.